काश्मीरला बळाद्वारे कुणीही जिंकू शकत नाही, केवळ पुण्य आणि प्रेमानेच जिंकू शकता, येथील रहिवासी फक्त परलोकाने भयभीत होतात, शस्त्रधारींच्या मुळे नाही ! – पंडित कल्हण (राजतरंगिणी भारताचा प्रथम लिखित इतिहास, तोही काव्यात्मक शैलित व संस्कृत मधे आहे ! 1148-50 या काळात त्यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे विजया लक्ष्मी पंडितांचे यजमान श्री रणजित पंडित यांनी जुलै 1934 मधे इंग्रजी भाषांतर केले असून साहित्य अकादमी ने 1968 साली प्रकाशित केले असून 1977,1990,2002 व माझ्या जवळ 2004 च्या कॉपी मधून मी हे कोटेशन दिले आहे ! )
पांच आगस्ट 2019 ला नरेंद्र मोदी सरकार ने दुसर्यांदा निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर, जम्मू – काश्मीरचे कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला ! हे 1950 मधे स्थापन केलेल्या जनसंघ या राजकिय पक्षाच्या धोरणाचाच भाग होता ! ज्याला 1980 नंतर भारतीय जनता पार्टी या नावाने ओळखले जाते ! जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी 370 कलम रद्द करण्यात यावे म्हणून 1953 साली जम्मू येथे सत्याग्रह केला असता झालेल्या अटकेत जम्मू जेल मध्ये ह्रदयाच्या धक्क्याने निधन झाले होते !
म्हणून मला माहीत होते की, बीजेपी पूर्ण बहुमताने निवडून आल्यानंतर, काश्मीरचे 370 कलम रद्द करण्याची कारवाई करेलच. तो त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात पण 370 कलम रद्द करण्याबद्दल समावेश होता. पण तत्पूर्वी काश्मीर संबंधित कुठल्याही संविधानाच्या अनुसार कराव्या लागणाऱ्या बदलांआधी, तेथील विधानसभेत तसा प्रस्ताव पास करायचा असतो. व 5 आगस्ट 2019 आधीच जम्मू आणि काश्मीर राज्यातील विधानसभा बरखास्त करण्यात आलेली होती. त्यामुळे जम्मू आणि काश्मीर व लद्दाख भाग वेगळा करण्यात व केंद्र शासित प्रदेश करण्यासाठी व सर्वाधिक महत्वपूर्ण 370 व 35 ए ही कलमें रद्द करताना व जम्मू आणि काश्मीरचे भारतात विलीनीकरण करतांना आक्टोबर 1947 मधे केलेल्या घटनात्मक तरतुदींची पायमल्ली झाली आहे !
याबद्दल 70 पेक्षा जास्त केसेस सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या आहेत. आणि या बदलाला अॉगस्ट मधे तीन वर्षे पूर्ण होताहेत. तरीही आपल्या सर्वोच्च न्यायालयाला, अद्याप 370 विरोधी व 35 ए बद्दलच्या याचिकांवर विचार करायला वेळ मिळाला नाही.
म्हणून मी स्वतः काश्मीर मध्ये काय परिस्थिती निर्माण झाली असेल ? हे पाहण्यासाठी मी दोनदा काश्मीरला (सप्टेंबर 2019 मधे व डिसेंबर 2019) लगेचच जायचा प्रयत्न केला होता. पण दिल्लीच्या विमानतळावरून परत पाठवण्यात आले. माझ्या आदल्याच दिवशी राहूल गांधी ला पण परत पाठवले असे मला अडवणारे आई बी चे लोक म्हणाले. नंतर कोरोना मुळे लॉकडाऊन दोन वर्षे असल्याने जाता आले नाही.
पण काश्मीरच्या मित्रांचे सारखे फोन येत होते ! की ” तुम्ही काश्मीरच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले पाहिजे ” ! म्हणून मी स्वतः व भागलपुर दंगली नंतर करत असलेल्या कामातील सहकारी मैत्रीण, शांतिनिकेतनवासी श्रीमती मनीषा बॅनर्जीं सोबत एक जून 2022 रोजी कोलकाता – जम्मूतवी एक्सप्रेस ने निघून ! जवळपास पन्नास तासांच्या, अत्यंत कंटाळवाणा प्रवास करून. तीन जून रोजी दुपारी दोन वाजता जम्मू स्टेशन वर पोहोचलो. तेथूनच स्टेशन परिसरातील वाहतूक व्यवस्थे मधून एक टाटा सुमो शेअर गाडी, श्रीनगर साठी मिळाली. तिच्यात ड्रायव्हर शेजारच्या जागेवर एक पंचवीसेक वर्षे वयाच्या सिख तरूण आधीच बसलेला होता ! आम्ही दोघे व आमच्याच डब्यातील वरच्या बर्थ वर, कोलकाता येथून एक पंचवीस तीस वर्षे वयाची तरूणी, लद्दाखला पर्वतारोहण कॅंप साठी चालली होती. म्हणुन मी तीला विचारले ” की तुला कुणी स्टेशन वर घ्यायला येणार आहेत का ?” तर ती म्हणाली की ” नाही मलाही श्रीनगर येथील यूथ होस्टेल वर, आमच्या गटात सामील व्हायला जम्मू येथून एकटीनेच जायचे आहे.” तर आम्ही तीला आमच्या सोबत चल म्हटले असता, ती पण आमच्या सोबत ड्रायव्हर मागे असलेल्या जागेवर, मी मनिषा व ती युवती असे चार प्रवासी व ड्रायव्हरच्या सोबतीला समोरच्या जागेवर, एक मदतनीस व तो सिख तरूण, असे सहा जण गाडीत बसलो होतो.मागील जागेत बरेच सामान भरून होते.
जवळपास साडेतीन वाजता आम्ही जम्मू सोडून, श्रीनगर रस्त्यावर येऊन फक्त पाच किलोमीटर अंतरावर, असलेल्या नाकाबंदी मधे, आमची गाडी अर्धा तास झाला तरी उभीच आहे. शेवटी मी स्वतः गाडी खाली उतरून नाकाबंदी केलेल्या जागेवरच्या पोलीसाला विचारले असता तो ” म्हणाला की समोरच्या रस्त्यावर दरड कोसळल्या मुळे रस्ता बंद करण्यात आला आहे ” मी “म्हणालो की इतर वाहतूक तर सुरूच आहे ” तर तो ” म्हणाला की ते लोक उधमपुर, कटरा पर्यंतच प्रवास करत आहेत ” हे सगळं ऐकून मी गाडीत येऊन बसल्यावर, दुसरा पोलीस माझ्यासोबत बोलणार्या पोलीसाला काही तरी बोलत असल्याचे पाहिले, तर त्यांनी आम्हाला पुढे जाण्यासाठी इशारा दिला. ही एका तासात जम्मू आणि काश्मीर राज्यातील पोलीस वा सुरक्षा रक्षकांची झलक दिसली. कारण तेथून निघून रात्रीच्या दहा वाजता श्रीनगर येथे पोहचे पर्यंत कुठेही दरड कोसळून पडलेली दिसली नाही. हा नवारस्ता बनवण्यासाठी, जागोजागी अडथळे येतात. व त्यामुळे तीन साडेतीनशे किलोमीटर अंतरावरील प्रवासाला, सात ते आठ तास लागतात.हे आमच्या लक्षात आले. कारण परतीच्या प्रवासाला पण,8 जून रोजी, सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास निघून, सायंकाळी पाचच्या सुमारास जम्मूच्या अलिकडे, पंधरा किलोमीटर अंतरावरील, पंडितांना पुनर्वसन करण्यात आलेल्या जागती व नगरौटा येथील कॅम्पमध्ये, आम्ही जम्मू स्टेशन वर जात असताना या कॉलनी मधे दोन तास थांबलो होतो.
म्हणून मी या वेळी मुद्दामच रेल्वे ने जम्मू पर्यंतच्या प्रवासा नंतर, जम्मूहून शेअर सुमो गाडीने प्रवास केला. यात जातांना तीन दिवस लागले आहेत. व येतांना पण तेवढाच वेळ. जवळपास एक आठवडा फक्त प्रवासातच गेले. हातात फक्त चार दिवस शिल्लक होते. तरीही या चार दिवसात, श्रीनगर एक दिवस, बांदीपोरा एक दिवस व उर्वरित दोन दिवस बडगाम, नेसबल, वाहकपोरा, हिलाल आबाद आरागम, हुश्रु, खान सराय, चादोरा, चरारेशरिफ इत्यादि ग्रामीण भागातील काही ठिकाणी भेटी देण्यात गेले.
चादोरा हे बडगाम जिल्ह्य़ातील तालुक्याचे ठिकाण आहे. तेथील तहसील कार्यालयात भर दिवसा 12 में रोजी राहुल भट्ट नावाच्या लिपिक असलेल्या काश्मिरी पंडिताचा खून करण्यात आला होता !
आमच्या मुक्काम असलेल्या बादीपोरा गावाला, श्रीनगरहून जातांना रस्त्यावर आधीच चादोरा लागते. म्हणून आम्ही रस्त्यावर असलेल्या तहसीलदार कार्यालयात जाऊन आलो. पण कुणीही राहुल भट्ट प्रकरणी बोलायला तयार नव्हते. 12 मे नंतर एका बॅंकेचा मॅनेजर जो नुकताच राजस्थानहून बदलून आला होता व बॅंकेतच त्याचा खून करण्यात आला होता. तसेच एका शिक्षिकेला शाळा सुरू असताना मारल्याचे वृत्त ताजेच होते !(30 मे रोजी) या बद्दल निषेध म्हणुन जम्मू व श्रीनगर येथे काश्मीरी पंडितांच्या निदर्शनांच्या बातम्या वाचून होतो.
आम्ही जूनच्या पहिल्या आठवडय़ात पोहोचण्याच्या आधीच, चार हिंदुच्या झालेल्या हत्यांपैकी. राहूल भट या सरकारी कर्मचारी असलेल्या चादोरा नावाच्या गावांमध्ये गेल्यावर कुणीही स्पष्ट बोलणे टाळत होते. फक्त Unidentified Gun एवढे म्हणून थांबले. हा वाक्यप्रयोग मी काश्मीरला गेलो की बहुसंख्य खूनानंतर ऐकत असतो .
2006 मध्येही मेच्या पहिल्या आठवडय़ात (पुनुन कश्मीर व मिरवाईज उमर फारुखच्या नेतृत्वाखाली असलेल्या हुर्रियतच्या निमंत्रणावरून) गेलो असताना, प्रथमच श्रीनगर मेडिकल कॉलेजच्या गायनॅकॉलॉजिस्ट डॉ. शमिमा बद्रू यांनी, आपल्या यजमानांना, 1990 मधे गोळ्या घालून ठार मारले असता, सांगितले की “माझ्या यजमानांना Unidentified Gun ने मारले आहे !” असा शब्दप्रयोग मी प्रथमच ऐकत होतो. पण आता हा शब्द कश्मीरचा ‘ तकियाकलाम ‘ झाला आहे. यातून तुम्ही तुमच्या सोयीचे अर्थ लावू शकता. निस्चित कुणीच बोलत नाही.
370 कलम रद्द केल्यानंतर काश्मीरला जायची माझी पहिलीच वेळ होती. पण कश्मीरचे लोक स्पष्ट बोलणे टाळत आहेत. असे मला या भेटीत जाणवले. प्रत्येक जण एकदुसर्याला संशयाने बघत आहे. वातावरणात अत्यंत संदिग्धता निर्माण झाली आहे, जी याआधीच्या कुठल्याही भेटीत दिसली नव्हती . लोकांच्या चेहर्यावर भिषण असाहाय्य असलेल्या भावनांचा कल्लोळ दिसला ! ही परिस्थिती फार चिंताजनक आहे. पूर्वी लोक मनमोकळ्या गप्पा करत असलेले पण अनुभवले आहे. पण आज त्यांचे बहुसंख्य नेते तुरुंगात टाकले आहेत. व जे कुणी बाहेर आहेत ते पण नजरबंदी मधे आहेत.
काश्मीर टाईम्स सारख्या सर्वात जुन्या वर्तमान पत्राला, 6 आगस्ट 2019 पासुन बंद करून ठेवले असुन. त्या वर्तमान पत्राची याचिका सुनावणीला घ्यायला सर्वोच्च न्यायालयाच्या न्याधिशांना तीन वर्षे झाली तरी वेळ मिळत नाहीये. आम्ही गेलो तेंव्हा( 8 जून 2022 रोजी) संपादक व प्रबंधक द्वय श्रीमती अनुराधा व प्रबोध जमवाल दिल्ली मधे, आपल्या वर्तमान पत्राची याचीका सुनावणी होणार या आशेवर तळ ठोकून होते ! म्हणून आम्ही फक्त त्यांच्या जम्मू व श्रीनगर दोन्ही कार्यालयांची कुलुपे सिलबंद केलेले पाहून आलो आहोत !
बीजेपी व संघाच्या ढोंगीपणा 25 – 26 जून रोजी आणीबाणीला 47 वर्षे झाली म्हणून, सत्ताधारी बीजेपी ने अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या नावाखाली गळा काढलेला पाहून अत्यंत कीळस आली !
काश्मीरचे वर्तमान चित्र डोळ्यासमोर दिसत आहे. 5 आगस्ट नंतर कित्येक दिवस वर्तमान पत्रे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. व त्यावेळी बंद करण्यात आलेल्या कैक वर्तमान पत्रे व पत्रिका बंद करून टाकल्या आहेत ! आणि समस्त बीजेपी आणीबाणीच्या काळात कशी सेंसरशिप होती ? म्हणून पोवाडे गात होते. 370 कलम रद्द करण्याला तीन वर्षे होत आली आहेत. पण काश्मीरचे लोक मग ते हिंदु असोत की मुसलमान भयग्रस्त दिसत आहेत.
त्यात कश्मिर फाईल्स नावाच्या सिनेमाने अजुन जास्त भर टाकली आहे. आज या घडीला कश्मीरी पंडित, असुरक्षेच्या भावने मुळे आम्हाला सुरक्षित बदल्या कराव्यात, म्हणून आंदोलन (जम्मू व श्रीनगर या दोन्ही ठिकाणी करत आहेत.) आणि गृहमंत्रालयाने 370 नंतर काश्मीरमधील दहशतवादी हल्ले कसे कमी झाले आहेत, हे दावे व प्रत्यक्ष परिस्थितीत केवढे अंतर आहे ?
तसेच पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी विशेष, प्रोत्साहन दिलेल्या कश्मीर फाईल्स नावाच्या, अतिशयोक्त व भडक विविध प्रकारच्या घटनांची मोडतोड करून बनवलेल्या . हिंदी सिनेमाने उरलीसुरली कसर भरून काढली ! कारण कश्मीरचा प्रश्न धार्मिक नसूनही या सिनेमात त्याला धार्मिक रंग द्यायचाच प्रयत्न केला आहे !
ह्या दोन्ही कृती काश्मीरच्या 90% पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या मुसलमानांना व काही प्रमाणात हिंदु व सिख जे काश्मीर मध्ये अजुनही राहिले आहेत. त्यांना असुरक्षित करण्यासाठी केलेल्या आहेत. जेणेकरुन उर्वरित भारतात ध्रुवीकरण करण्यासाठी उपयोग होईल. हाच एकमेव विचार ठेवून केलेली कृती आहे. त्यामुळे तेथील हिंदु सिखांच काहीही होवो ! बीजेपी हिंदु – मुसलमानां मधील दरी वाढवण्यासाठी काश्मीरचा प्रश्न मुद्दामच अतिशयोक्ती करून त्याचा वापर करत आहे. कश्मीरचे पंडितांना एन डी ए चे सरकार विस वर्षांपूर्वीच्या वेळी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली बीजेपीला सहा वर्षे सत्ता मिळाली असताना पंडितांना काश्मीर मध्ये नेण्यासाठी काय कृती केली ? व आत्ता पण तीन वर्ष झाली आहेत कोणत्याही प्रकारची तयारी पंडितांना त्यांच्या मुळ ठिकाणी नेण्यासाठी चाललेली आम्ही आमच्या डोळ्यांनी बघीतली नाही .
पण काश्मीरी मुसलमानांवर सुरूवातीपासूनच, उदारमतवादी सुफी संतांचा प्रभाव असल्याने. जे पण हिंदु वा सिख शेकडो वर्षे झाली रहात आहेत. त्यांच्याशी संवाद साधला असता. मुखतः खान सराय नांव असलेल्या गावांमध्ये. (मुगल सराय नांवाने कश्मीर मधे अजुन एक आहे ! या ऐतिहासिक ठिकाणा पासुन चार – पांच किलोमीटर अंतरावरील ! ) पन्नास ते साठ घरे खान सराय नावाच्या गांवात सिखांची आहेत. आणि चारशेच्या वर वर्षे झाली ते गुण्यागोविंदाने राहत आहेत. तेथे गुरुव्दारा पण व्यवस्थित आहे. एकूण सिखांची संख्या काश्मीर मध्ये पस्तीस ते चाळीस हजार असुन. ते शेती, फळांच्या बागा व काही दुकाने, हॉटेल्स व्यवसायात आहेत. तसेही सिख भारतात सर्वत्र आहेत व जगातील बहुसंख्य देशात पण आपापल्या व्यवसायात दंग आहेत !
2006 साली श्रीनगर शहरातील काठी दरवाजा येथील सर्वात मोठय़ा छठी पादशाही गुरूद्वारा मधे गेलो असताना. सरोपा पण स्विकारला आहे ! (गुरूद्वारा प्रबंधक कमेटी तर्फे हा बहुमान अपवादात्मक दिला जातो !) आणि गुरुद्वारा मधील चोविस तास सुरु असलेल्या लंगरचे जेवण करूनच, श्रीनगर शहर सोडुन परतीच्या प्रवासाला सुरुवात केली होती !
व मनात आले की “1990 मधे मोठ्या प्रमाणात पंडितांना, काश्मीर खोऱ्यातील आपल्या पिढीजात इस्टेटी व घरे – दारे सोडून, अंगावरील कपड्यांतच निघून जावे लागले आहे. व संघाचे प्रदीर्घ काळ प्रमुख पदी राहिलेले संघप्रमुख श्री. माधव सदाशिव गोलवलकर कायम म्हणायचे की ” हिंदु धर्माच्या रक्षणासाठी पाचशे वर्षांपूर्वी सिख संप्रदायाची स्थापना करण्यात आली आहे !” काश्मीर मध्ये सिख चारशेच्या वर वर्षे झाली रहात आहेत. त्यांच्या गुरूद्वारांना साधा ओरखडा पण पडलेला पाह्यला नाही. पण पंडितांना मात्र निवडून – निवडून काढून टाकले, याचे कारण काय असावे ? कारण गोलवलकर गुरूजींच्या भाषेत हिंदु धर्माच्या रक्षणासाठी निघालेल्या सिखांपैकी किती सिख काश्मीर सोडून गेले ? तीन जून रोजी जम्मू स्टेशन वरून येताना आधिच सुमोत बसलेल्या पंचविशीचा सिख युवकासोबत गाडीत बसून गप्पा करत असता तो म्हणाला की मी चार वर्षे झाली गुरदासपुर पंजाब राज्यातील एक शहराच्या इंजिनिअरिंग कालेजात शिक्षण घेत होतो आता ते पूर्ण करून घरी त्राल काश्मीरचे सर्वात जास्त आतंकवादी क्षेत्रात गणना होते ते, अनंतनाग जिल्ह्य़ातील गांवाचा रहिवासी असून वडील वारले आहेत घरी आई एकटी असुन आमच्या सेब व इतर फळांचे बगीचे आहेत व तुम्ही म्हणता की आमच्या त्रालची आतंकवादी क्षेत्र म्हणून बदनामी आहे ! आज चार वर्षे झाली मी पंजाब राज्यातील गुरदासपुर येथे शिक्षण घेत असताना फक्त अधुनमधुन सुट्यांमधे येत होतो माझी आई आमची शेती तीही फळबाग असलेल्या व्यवस्थित करत आहे ! माझ्या कडे थांबून आज मुक्काम करून स्वतःच्या डोळ्यांनी बघूनच जा असा आग्रहही त्याने केला होता ! म्हटल की यावेळी वेळ कमी आहे पण तुझ्या घरी यापुढे आलो म्हणजे मी जरुर येईल असे सांगून निघालो कारण रात्रीचे दहा वाजले होते. व आम्हाला घ्यायला एका मित्राने आपल्या ड्रायव्हरला हायवेवर एका ठिकाणी पाठवले होते म्हणून आम्ही सिख तरूणाचे आभार मानले व पुढील भेटीत येऊ म्हणून निरोप घेतला !
कारण आज 90 %पेक्षाही जास्त लोकसंख्या असलेल्या काश्मीरच्या मुसलमानांनी. हजार – अकराशे वर्षे झाली हिंदु धर्माचा त्याग करून इस्लाम धर्माचे होण्याची कारणे, हिंदु धर्मातील जाति-व्यवस्था मुख्य कारणीभूत आहे हे. स्वामी विवेकानंद यांनी देखील सांगितले आहे. व 66 वर्षांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदु धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारन्याचे कारण त्यांनीच स्पष्ट केले आहे.
भारतातील बहुसंख्य धर्मांतराचे खरे कारण हिन्दु धर्मातील जाति-व्यवस्था मुख्य कारणीभूत आहे. हे लक्षात घेऊन जातिनिर्मूलनाचे काम करायच सोडून. संघाच्या मंडळींना मुसलमान, ख्रिश्चन धर्माच्या लोकांच्या विरोधी द्वेष पसरवणे महत्त्वाचे वाटते.
काश्मीरच्या पंडितांना काश्मीर सोडून इतरत्र रहावे लागत आहे. तरीही ते मुसलमानांना अस्पृश्य समजतात. आम्ही मुसलमान मित्रांच्या घरी उतरले आहोत व त्यांनी केलेले जेवण जेवतो याबद्दल जागती व नगरौटा कॅम्प मधे राहणारे पंडित पून्हा- पून्हा आस्चर्य व्यक्त करत असलेले पाहून, जम्मू स्टेशन वर परतीच्या प्रवासात मनात एक सल घेऊन आलोय !
आज या घडीला एका कश्मीरी कुटुंबा मागे एक सेनेचा नौजवान उभा आहे. उद्या प्रत्येक कश्मीरी मागे एक जवान नेमला तरीही, काश्मिरात हिंदुचे परतणे कठीण वाटते. कारण काश्मीरच्या पंडितांना, काश्मीरी मुसलमानां सोबत जोपर्यंत बरोबरी ने राहणे जमणार नाही. तोपर्यंत तरी मला कठीण वाटते. रेल्वेच्या काही तासांच्या प्रवासात एखाद्या सहप्रवासीसोबत कुठल्याही कारणाने भांडण झाले तर संपुर्ण प्रवास करत असताना आपली मनस्थिती बिघडते. इथे तर पीढ्या दर पीढी राहणाऱ्या लोकांच्या मनात तुच्छतेची भावना मनात ठेवून कसे राहणे होईल ?
जम्मूहून श्रीनगरला जात असताना, आता काश्मीर खोऱ्यातप्रवेश करण्यासाठी, नव्याने बोगदा तयार करण्यात आला असून, त्याचे नाव डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी आहे. बोगद्यात प्रवेश करण्याआधी सुरक्षा रक्षक वाहनांची कसून तपासणी करूनच गाड्या आंत जाऊ देतात. आमच्या गाडीने जात असताना चालकाच्या मागील जागेवर मी धरून दोन बायका बंगाल राज्यातील होत्या व चालकाच्या बाजूला तो गुरदासपुरच्या इंजिनिअरिंग कालेजातील शिक्षण संपल्यावर, घरी परत निघालेला त्रालचा रहिवासी सिख तरूण होता. व मागील जागेत सगळे सामान होतं. सुरक्षा रक्षकाने आम्ही कोण आहोत व कुठून आलात ? विचारले असता, आम्ही दिलेल्या उत्तराने पुढे काही एक विचारले नाही. पण ड्रायव्हर व त्यांच्या शेजारी असलेल्या सिख तरूणाला गाडी खाली उतरून त्यांच्या ओळखपत्रे व इतर तपासणी करूनच मग काय ते गाडी बोगद्यातून जायला परवानगी दिली.
तसे पाह्यलं तर आम्ही तीघे काश्मीर बाहेरच्या भागातील नागरिकांना आरामात परवानगी देण्यात आली. व स्थानिक नागरिकांना तपासणी करून सोडण्यात येत असल्याचे पाहून, मला वाटले की हा काश्मीरच्या रहिवाशांना अपमानास्पद वागणूक देणारा प्रकार आहे. म्हणून एकूणच भारतीय सेना वा इतर पॅरामिलिटरी बद्दल स्थानिक लोकांना राग आहे. कारण आपले सैन्य रात्री अपरात्री स्थानिक लोकांच्या घरात घुसून धाडी टाकून, त्यांच्या सामानाची नासधूस करून, व बायका – मुलींच्या सोबत धसमुसळेपणा करून, तरुण मुलगा असेल तर ते सोबत घेऊन जातात.
अशा प्रकारे तीस ते पन्नास हजार, चाळीस वर्षीच्या खालील वयाचे लोक गायब आहेत, व त्यांना शोधून काढण्यासाठी एडवोकेट परवेज इमरोज नांवाचे वकिलसाहेब काश्मीर पीयूसीएलचे अध्यक्षांनी मिसिंग परसंन्स क्साड नांवाने एका संस्थेच्या माध्यमातून त्यांना शोधण्याचा प्रयत्न गेल्या पंचवीस वर्षापासुन करत आहेत, एक कोटी पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या, या भागातील सुमारे पन्नास हजार पेक्षा जास्त, चाळीस वर्षे पेक्षा कमी वयाची माणसे गायब असल्याचे पाहून मला त्या दिवसापासून झोप येत नाही.
आणि आपण आमचा काश्मीर म्हणून, आपापल्या सुरक्षित भागात राहणाऱ्या, नागरिकांना फक्त काश्मीरचे निसर्ग सौंदर्य पाहिजे आहे. पण काश्मीरचे एक कोटी लोकांचे जीवन, गेले पंच्याहत्तर वर्षे झाली तरी ते डोळ्यात पाणी आणून विचारतात की” तुम्ही स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे झाली तरी आमची मने जिंकली नाहीत ! उलट आर्मीच्या टाचेखाली आमच्या वर अन्याय अत्याचार करत आहात.” हे ऐकल्यावर मी निरूत्तर होतो ! व शरमेने मान खाली होते .
कारण मला आणीबाणीच्या काळापासून कश्मीरमधे जायची संधी मिळाली असुन, या 47 वर्षांत मी किती वेळा गेलोय ते पण आठवत नाहीये. पण 1975-77 मधे आतंकवाद हा शब्द देखील मला ऐकलेला आठवत नाहीये.
उलट बलराज पूरी व वेद भसीन सारख्या जुन्या समाजवादी मित्रांनी सांगितलेले आठवत आहे ” की काश्मीरच्या इतिहासात प्रथमच फ्री & फेअर निवडणूक जनता पक्षाचे सरकार असताना 1977 मधे पार पडली ! व त्या नंतर दहा वर्षांनी 1987 मध्ये झालेल्या निवडणुकीत, प्रचंड प्रमाणात तत्कालीन केंद्रातील सरकारने हस्तक्षेप करून संपूर्ण निवडणूक आपल्याला सोयीस्कर होईल या पद्धतीने संरक्षण दलांच्या मदतीने आटोपली. आणि या मुळे काश्मीर मध्ये वेगवेगळे जनआंदोलन करणारे गटातील बहुसंख्य तरूणांनी काश्मीर मधील वर्तमान पत्रांच्या कार्यालयात जाऊन आता आमचा बॅलेट पेपर वरील विश्वास उडाला असुन आम्ही बुलेटच्या मदतीने हा प्रश्न सोडविण्यासाठी, पाकिस्तानच्या मदतीने आम्हाला जे पण काही करायचे आहे ते करू ! ” काश्मीर टाईम्समध्ये वर्तमान संपादक प्रबोध जमवाल यांच्या कडूनच मला हा सगळा तपशील 2006 मधील काश्मीर भेटीत कळला होता !
तसेच कश्मीरी पंडित कुटुंबातील जन्म झालेल्या नंदिता हक्सर यांनी THE MENY FACES OF KASHMIRI NATIONALISM (FROM THE COLD WAR TO THE PRESENT DAY) लिहिलेल्या पुस्तकात पण तपशीलवार वर्णन केले आहे, शिवाय अशोक पांडे, ए जी नूरानी, बलराज पूरी, सुमन बोस, प्रेमनाथ बजाज, शेख अब्दुल्ला, सगळ्यात महत्वाचे ए. एस. दुलत जे आई बी, सीबीआई आणी रॉ सारख्या अत्यंत महत्त्वाच्या एजेंसींचे अधिकारी पदावर कार्यरत राहीलेले ! दुलातांनी लिहिलेले KASHMIR : THE VAJPAYEE YEARS, शिर्षक असलेले पुस्तक वाचून तर. काश्मीर प्रश्नांच्या गुंतागुंतीची सर्वात मोठी जबाबदारी भारतीय आई बी, सीबीआई व रॉ व पाकिस्तानच्या आय एस आय यांच्यावर टाकलेली वाचून, मी लगेच मुंबई पत्रकार परिषदेत पांच वर्षांपूर्वी दुलतांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे,
जसे गुजरात फाईल्स वाचल्यावर राना आयुब यांच्यावर, कारवाई करावी अशी मागणी केली आहे. व एस. एम. मुश्रीफ यांच्या HOO KILLED KARKARE या पुस्तकाचे प्रकाशन समारंभात, दिल्ली येथील कॉन्स्टूट्यूशन क्लबच्या हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात, वक्ता म्हणून बोलत असताना मी मागणी केली आहे. ” की लेखकाने आमच्या देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या एजन्सींवर गंभीर आरोप केले आहेत. ” पण आत्ता पर्यंत या पैकी कुणाला साधी नोटीस देखिल दिलेली नाही. यावरून काय ते समजावे !
एकीकडे देशप्रेम व देशद्रोहीची जुगलबंदी करायची. व प्रत्यक्षात काश्मीर असो की गुजरात, मालेगाव, मुंबई 26/11 या सगळ्याचा सोईस्कर पणे राजकारणात वापर करायचा. व प्रत्यक्षात लोकांच्या जीवनातील रोजच्या आयुष्यात येणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी काही एक न करता. पुन्हा पुन्हा लोकांची दिशाभूल करीत, आपल्या राजकीय पोळ्या भाजून घ्यायचा खेळ खेळत आहेत. सवाल आस्था का है, कानून का नही. सारख्या संविधान विरोधी घोषणा देत लोकांना वापरायचे !
आत्ता पण काश्मीर फाईल्स सिनेमा भारतीय इतिहासात पहिल्यांदाच कुणी पंतप्रधान, स्वतः एखाद्या सिनेमाच्या प्रचारात पुढाकार घेतो ! हे पंतप्रधान पदाचे अवमूल्यन आहे !
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत तयार झालेल्या, जगमोहन नांवाचा अधिकारी बीजेपी च्या दबावामुळे. अल्पमतात असलेल्या बीजेपी चा बाहेरून पाठिंबा असलेल्या श्री. वी पी सिंह सरकारने 1990 च्या सुरुवातीलाच 18 जानेवारी रोजी बीजेपी च्या दबावाखाली राज्यपाल म्हणून केंद्र सरकारतर्फे जगनमोहन या वादग्रस्त माणसाची नियुक्ती करण्यात आली. व त्यांनी 19 जानेवारी रोजी अधिकृतपणे काम करायला सुरुवात केली. तीच मुळी, 19 जानेवारीला रात्रीच्या अंधारात श्रीनगर शहरात पैरा मिलिटरी ने घरा – घरात घुसून तपासणी सुरू केली. आणि जगनमोहन ला खुष करण्यासाठी, सी आर पी एफ चे महानिदेशक श्री जोगिंदर सिंह ने त्या रात्री श्रीनगर डाऊनटाऊन येथून 300 युवकांना अटक करून घेऊन गेले. व स्त्रियांच्या सोबत अभद्र व्यवहार केला. ज्या मुळे आगीत तेल ओतले गेले. व 20 जानेवारी रात्री संपूर्ण श्रीनगर शहरात उग्र प्रदर्शन झाले. ती रात्र श्रीनगरच्या इतिहासातील सर्वात भयंकर रात्र झाली. त्यात जवळपास संपूर्ण श्रीनगर शहर सडकेवर उतरले होते. व प्रशासन संपूर्ण कोलमडून पडले होते. या पार्श्वभूमीवर राज्यपाल जगनमोहन यांनी केलेल्या कृत्याचा परिणाम म्हणून, काश्मीरच्या पंडितांना तात्पुरते नेतो असे सांगून. आर्मीच्या वाहनांमधून असेल त्या अवस्थेत उचलून नेले. असे सांगणारे पंडित अजुन देखिल चार ते पाच हजार कश्मीरी हिंदु काश्मीर मध्ये रहात आहेत. व 35000 हजार सिख गेले चार पाच शे वर्षे झाली रहात आहेत.
काश्मीर फाईल्स सिनेमा मधे 19 जानेवारी 1990 या तारखेचा फलक घेऊन आनुपम खेर उभा आहे . पण राज्यपाल जगनमोहनचा उल्लेख कुठेही दिसत नाही. हा तोच गृहस्थ आहे, ज्याने आणीबाणीच्या काळात दिल्ली येथील जामा मशिदीच्या परिसरातील तुर्कमन गेट कांडात, डी डी ए चे चेअरमन असताना, हजारो मुसलमान लोकांवर बुलडोझर चालवून. विस्थापित करून आजच्या यमुना नदीच्या काठावर वसलेली सिलमपूरी (बहुसंख्येने मुसलमान आहेत) म्हणून जगनमोहनचा मुस्लिम विरोधी चेहरा आजपासून 47 वर्षांपूर्वीच लोकांना दिसलेला आहे. म्हणून काश्मीर मध्ये जानेवारी अठरा तारखेला गेलेल्या, राज्यपालांचे हे प्रताप पाहून पाच महिन्यांपूर्वीच जगमोहन यांना राज्यपाल पदावरून में 1990 मधे पायउतार व्हावे लागले आहे. बहुतेक काश्मीरचे सगळ्यात कमी अवधिचे राज्यपाल राहिले आहेत !
पण काश्मीर फाईल्स सिनेमांत त्यांच्या नावाचा साधा उल्लेखही नाही ! तर हा सिनेमा अत्यंत एकतर्फी व मुस्लिम विरोधी इमेज तयार करण्यासाठी ! टिपिकल संघाच्या डिस्कोर्स वर बेतलेली डॉक्युमेंटरी आहे ! ज्याला सिनेमा म्हणून प्रमोट केले आहे ! अशा तर्हेने खोटे, अतिशयोक्ती करून काढलेल्या टुकार डॉक्यूमेंटरी मुळे कश्मीरी मुसलमानांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत ! त्यामुळे तेथे राहतात ते हिंदु आता, असुरक्षित मानसिकते मधे गेलेले दिसत आहेत !
मुळात काश्मीरचा प्रश्न हिंदु – मुसलमानांचा प्रश्न नाहीये ! तो कश्मीरचा सांस्कृतिक प्रश्न आहे व त्यात बरेच काश्मीरी हिंदु पण सामील आहेत ! उदाहरणार्थ 1977 मध्ये श्री बलराज पूरी यांना जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यावर प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया चे अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली असता. त्यांनी सांगितले की मी कश्मीरचा आहे, मला भारतीय प्रेस कौन्सिल ऐवजी काश्मीर प्रेस कौन्सिलचे पद दिले तर चालेल ! ”
तसेच आत्ताच्या भेटीत पंडित संपत प्रकाश (वयवर्ष 86) देखील काश्मीरी स्वायत्ततेचा पुरस्कार केलेला इंटरव्यू मी स्वतः पांच जून रोजी घेतला असून, तो मी यूट्युबवर टाकला आहे. स्वायत्तता समस्त उत्तर पूर्व राज्यांची पण मागणी आहे. (नागा, बोडो, कर्बी, खासी,जातियां, मणिपूरी, अशा कितीतरी जमातीच्या मागण्यांसाठी आंदोलने सुरू आहेत!) तसेच पाकिस्तान मध्येपण सिंधी, बलुच, स्वात खोऱ्यातील व पूर्व नॉर्थ इस्ट फ्रंटियर नवे नाव फेडरल एडमिनिस्ट्रेटिव एरिया (फटा) इरान, इराक, टर्कीच्या समेवर असलेल्या कुर्दीश लोकांचा सुरू असलेल्या लढ्याला किती वर्षे झाली तरी ते लढत आहेत ! आपल्या शेजारच्या बंगला देशाची निर्मिती कशी झाली ? असे स्वायत्तता मागणाऱ्या लढ्याला काय मिलिटरीच्या बुटांनी चिडणार ?
तसेच उर्वरित भारतात राहणारे बहुसंख्य आदिवासींच्या मागण्या काय आहेत ? नक्सलाईट शिवी देऊन त्यांना अपमानित करणार ? एक चतुर्थांश भारतीय जनता स्वायत्ततेचा आग्रह धरणाऱ्यां मधे आहे ! आणि म्हणूनच भारत स्वतंत्र झाल्यावर संविधान निर्माण करतांनाच 370, 371,372 सारख्या इतर ठिकाणीही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत(मुख्यतः उत्तर पूर्व राज्यांत !)
काश्मीर एकमेव राज्य नाही ज्याला विशेष दर्जा दिला आहे. पण सुरूवातीपासूनच काश्मीर मुस्लिम बहुल आहे, म्हणुन संघाच्या तर्फे काश्मीरला लक्ष केले जात आहे. तसे पाहिले तर फाळणीच्या वेळी काश्मीर सर्व अर्थाने (लोकसंख्या, भौगोलिक स्थिति पाहता पाकिस्तान मधे जायला पाहीजे होते!) आणि भारतीय संस्थानांचे विलिनीकरण करत असतांना, ज्या सरदार पटेल यांना वर्तमान सरकार डोक्यावर घेऊन जवाहरलाल नेहरू यांच्या वर सतत टीका केली जात आहे. तर सरदार पटेल यांना काश्मीर कायमची डोकेदुखी राहणार. म्हणून भारतात घेण्यात स्वारस्य नव्हते ! पण जवाहरलाल नेहरू व शेख अब्दुल्ला यांच्या आग्रहाने काश्मीर भारतात आलेले आहे. काश्मीरचा हिंदु राजा भारतात सामील होण्या ऐवजी, बॅरिस्टर मोहम्मद अली जिना सोबत देखील बोलणी करत होता ! आणि त्यावेळी प्रजापरिषद (संघाचीच जम्मू मधील राजकीय आघाडी) जी सतत राजाच्या बाजुने असायची. जसे उर्वरित भारतात संघ इंग्रजांच्या बाजुने होता, म्हणून संघाच्या इतिहासात भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात सामील झाल्याचा उल्लेख कुठेही नाहीये !
पांचवी व सहावी अनुसूचित पंधरा ते वीस कोटी आदिवासी समाजाचा समावेश आहे. तेथे पण गैर आदिवासी जमीन विकत घेऊ शकत नाही.पण काश्मीर मध्ये बहुसंख्येने मुस्लिम समुदाय असल्याने, संघ व संघाची राजकीय आघाडी व तत्सम संघटना, गेल्या पंच्याहत्तर वर्षांपासून काश्मीर प्रश्न सांप्रदायिक ध्रुवीकरण करण्यासाठी वापरत आहेत. वास्तविक पाहता काश्मीरी मुसलमान उर्वरित भारतीय मुस्लिम समुदायांच्या तुलनेत अत्यंत उदारमतवादी असुन, सुफी संताच्या प्रभावामुळे तुलनेने उदारपंथी आहे ! आणि म्हणूनच फाळणी होत असताना बॅरिस्टर मोहम्मद अली जिना सहा आठवडे श्रीनगर मधे तळ ठोकून बसले होते. जीनांना कश्मीरचे मुस्लिम समाजाला पाकिस्तान मध्ये सामील होण्यासाठी, समजून सांगायला अपयश आले होते.म्हणूनच ते महाराज हरिसिंहला तोंडी स्वायत्तता देईन म्हणून आश्वासन देत होते. पण लेखी द्यायला तयार नव्हते, व दुसरीकडे कबायलींचा आडोसा घेऊन जोर-जबरदस्ती पण करत असलेले पाहूनच. महाराज भारतात सामील होण्यासाठी (370 कलम केल्यामुळे ) भारतात सामील झाले. ज्या करारावर स्वाक्षरी करण्यारांमधे शेख मोहम्मद अब्दुल्ला व तत्कालीन केंद्रीय मंत्रीमंडळात सामील असलेल्या श्री शामाप्रसाद मुखर्जी यांनी पण सही केली आहे. भले त्यांनी मंत्रीपद गेल्यावर 370 रद्द करण्यासाठी आग्रह धरला होता.
पांच अॉगस्ट 2019 रोजी दुसर्यांदा निवडणूक जिंकून नरेंद्र मोदी सरकारने 370 कलम रद्द करून जम्मू आणि काश्मीर राज्याचे स्वरूप बदलून, केंद्र शासित प्रदेश केल्याची भारतीय स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्यांदाच कुठल्या राज्याच्या दर्जा समाप्त केला. तोही विधानसभा भंग असतांनाच, ही सगळी कृती भारतीय राज्यघटनेच्या विरोधी आहे.
6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशिद पाडल्यानंतर काश्मीर मध्ये साडे तीनशे मंदिर पाडले. असे निवेदन श्री. लालकृष्ण अडवाणी यांनी केले होते.व इंडिया टुडे ने आपल्या प्रतिनिधीला पाठवून या निवेदनाची खातरजमा केली होती व एकाही मंदीराची तोडफोड केली नव्हती. असे इंडिया टुडे ने 29 वर्षे झाली रिपोर्ट प्रसिद्ध केलेला आहे. तरीही या बद्दल मुद्दाम चौकशी करायचा प्रयत्न केला असता. मंदीरांची तोडफोड तर दूरच राहिले. उलट आम्ही ज्या ज्या ठिकाणी मंदिर दिसले, तेथे जाऊन प्रत्यक्ष पाहिले असता. उलट त्या परिसरात हिंदु नव्हते, पण मंदिर व्यवस्थित असलेले पाहिले. उदाहरणार्थ बादीपोरा जिल्हा बडगाम आठ हजार वस्तीचे गांव, पांच हिंदुची घरे बंद आहेत, पण गावाच्या शेजारच्या टेकडीवर दुर्गा मंदिर व्यवस्थित दिसले. तेथील मंदिराच्या व्यवस्थे साठी गावातीलच एक वयस्कर अजिज नावाच्या मुस्लिम गृहस्थ बघीतला. त्यानेच सांगितले की जवळच हुश्रु नावाच्या एका गावात पण मंदिर आहे व तेथे काही हिंदु पण राहतात. म्हणून आम्ही हुश्रु गांवात गेलो होतो. तेंव्हा तेथे बरीच हालचाल दिसली, पण तेथे राहणार्या एका चाळीशीच्या गृहस्थाने सांगितले की ” तो अमेरिकेतील नोकरी सोडून आलाय व ब्रम्हचारी आहे, ब्राह्मण आहे, हे पुन्हा पुन्हा सांगत होता. चक्क जानवे काढून दाखवले. त्याच वयाची एक स्री पण होती, आणि पहिल्या मजल्यावर एका सर्वत्र पडदे लावलेल्या हॉलमध्ये, कुणी साक्षात्कारी महाराज राहतात ते कुणालाही भेटत नाहीत. ते अमेरिकेत राहून आले म्हणणारे गृहस्थाने व सोबत असलेल्या बाईने आमचीच चौकशी केली असता. आम्ही काश्मीरी मुस्लिम कुटुंबात उतरलो आहोत, हे ऐकून खुपच आस्चर्य व्यक्त केले व आम्ही तेथील जेवण पण जेवतो हे ऐकून तर ” म्हणाले की आम्ही मुसलमान लोकांना म्लेंछ (अस्पृश्य) समजतो व त्यांच्या सोबत आम्ही रोटी व्यवहार करत नसतो. त्यांची भांडी वेगळी ठेवतो. मी म्हणालो की त्यामुळेच तर काश्मीर मध्ये बहुसंख्य लोक मुसलमान झाले आहेत, व डॉ बाबा साहब अंबेडकरांनी पण आपल्या लाखो अनुयायांसोबत आमच्या नागपुरातील दिक्षाभूमी येथे 66 वर्षे झाली, बौद्ध धर्माचा स्वीकार केला. स्वामी विवेकानंदापासून माझेही मत आहे “की भारतात इस्लाम-ख्रिश्चन धर्माचा स्वीकार बहुजन समाजातील लोकांनी स्वतः होऊन स्विकार केला. तो चाळीशीचा व्यक्ती एकदम उसळून म्हणाला ” की आप बहुत ही संवेदनशील बात को छेड रहे हो. ” जर का मी अजुन लाऊन धरले असते तर कदाचित तो मारायला धावला असता.व पुन्हा पुन्हा” ब्राह्मण हूँ, हमारा पांच हजार वर्ष पुराना इतिहास है. ” मनातल्या मनात म्हटले की थोडा युवाल नोह हरारीचे सेपियन्स अ ब्रीफ हिस्टरी ऑफ हुमनकाईंड बघून घे, पण त्याच्या अविर्भावाला पाहून मी मौन बाळगले. 5 जूनला परवेज ऋषि च्या गांवी जिल्हा बांदीपोरा अमरनाथ यात्रेच्या वाटेवर आहे. तेथे पण एक जुने मंदीर शाबूत अवस्थेत आहे. तेथे जाऊन पाहिले असता कश्मीरचे पोलीस पहारेकरी भेटले, व स्वतः आग्रह करून मंदीराच्या जवळ असलेल्या विहिरीचे पाणी किती गोड आहे म्हणून, रहाटाने दोर बांधून बादली भरून पाणी काढून आम्हाला पाजले.
2016 मधे पण नगरोटा जवळ जागती कॅम्प मध्ये राहणारे पंडितांच्या भेटीत जवळपास हाच अनुभव आला. व आत्ता पण परतीच्या प्रवासात वाटेवर असल्याने पुन्हा एकदा ताजा- ताजा जाऊन आलो असता. अहंकार तोच आहे. आता नरेंद्र मोदी सगळे काही ठीक करेल. असे ऐकून मी म्हणालो की तीन वर्षे झाली अजुन तुम्ही तुमच्या कॅम्प मधेच आहात, आता पर्यंत मुळ गांवी का नाही नेले ? तर म्हणाले की मोदी महादेवाचे अवतार आहेत, ते सर्व काही व्यवस्थित करतीलच, असे जागति कॅम्पचे मट्टू नांव असलेल्या पंडिताने सांगितले. मी निघताना बोललो “की तुम्ही मुस्लिम लोकांना अस्पृश्य समजून त्यांच्या सोबत कसे राहणार ? आपापसात प्रेम भाईचारा तुच्छतेने वाढणार की कमी होणार ?” हा प्रश्न करून जम्मू स्टेशन वर पोहोचलो असता. मनात सारखा विचार येत होता की ” याच्चयावत सिखांची खान सराय मधील आनंदी चेहरे कुठे ? आणि या पंडित मंडळींचा वंशश्रेष्ठत्वाचा अहंकाराचा कंड जीरल्याशिवाय. पंडितांचे काश्मीर मध्ये पुनर्वसन अशक्य आहे , आणि विस्थापन होण्याची कारणे पण वंशश्रेष्ठत्वाचा गंड असणार, जो सिखांची वस्तीतील लोकांना भेटून त्याचा वास देखिल आला नाही. आणि तरीही कश्मीर फाईल्स सिनेमा मधे अनुपम खेरच्या हातात 370 रद्द करण्यात आला पाहिजे व मनुस्मृति लागु करण्यात यावी अशी मागणी करण्याचा फलक झळकत आहे. आणि या देशाचे पंतप्रधान या सिनेमाचा प्रचार – प्रसार करत आहेत व राज्य सरकारांनी तो करमुक्त करावा असे आवाहन करताना पाहून वाटते की नरेंद्र मोदी निवडणुकीत कितीही आपल्या तेली जातिचे भांडवल करोत. पण संघ व बीजेपी च्या मनुस्मृति वर आधारीत भारताच्या प्रयोगशाळेचे एक कर्मचारी आहेत . नाहीतरी ते स्वतःच प्रधान सेवक हूँ असे म्हणतातच.
पांच अॉगस्ट 2019 रोजी एन डी ए सरकार दुसर्यांदा सत्तेवर आल्यानंतर पंच्याहत्तर दिवसाच्या आत जम्मू कश्मीर लद्दाखचे विभाजन व 370 कलम रद्द करण्याचा निर्णय घेतला.
ज्या पद्धतीने पहिल्यांदा 2014 साली निवडून आल्यानंतर, 9 नोव्हेंबर रोजी नोटबंदीचा निर्णय घेतला. त्याच पद्धतीने अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. वास्तविक दोन्ही निर्णयामुळे सर्व सामान्य नागरिकांना काय भोगावे लागले ते जगजाहीर आहे.
कश्मीरचे 370 कलम काढण्या पूर्वी किमान एक लाख अतिरिक्त सैनिक काश्मीर मध्ये नव्याने पाठवण्यात आले. आधीच 1947 च्या अॉक्टोबर मधे पाठवलेले सैन्य परत आलेले नाही. उलट वेळोवेळी त्यांच्या संखेत भर पडत आहे. भारताच्या संरक्षण दलाचे प्रत्येक विभागातील सैनिक कश्मीर मध्ये पहायला मिळतात. (पायदळ, सिमासुरक्षा दल, बीआरओ, सीआरपीएफ, तिब्बत पुलिस, एका कश्मीरी कुटुंबा मागे एक सैनिक असे प्रमाण आहे. बहुतेक जगातील एकाच विशिष्ठ भागात एवढे सैनिक असलेले कश्मीर एकमेव भूभाग असावा. कारण मी पॅलेस्टाईनला दोनदा जाऊन आलो आहे. आणि जगातील सर्वात अशांत भाग म्हणून पॅलेस्टाईनची ख्याती आहे. पण पॅलेस्टाईन मधे पण इस्राइली सैनिक प्रत्यक्षात दिसत नाहीत. (कदाचित आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून ते पॅलेस्टाईनवर नजर ठेवून असतीलच !) पण कश्मीर मधे आपले सैनिक जागोजागी वावरत आहेत. कश्मीरमधे जन्माला आलेल्या मुलाला वा मुलीला डोळे उघडल्यावर जर का हेच दृश्य दिसत असेल तर, त्यांच्या मनावर काय परिणाम होत असेल? हा प्रश्न मला नेहमी काश्मीर मध्ये गेल्यावर अस्वस्थ करत असतो.
1974 पासुन माझ्या काश्मीर यात्रेला सुरूवात झाली आहे. श्रीमती खैरनार यांच्या नोकरीची सुरुवात काश्मीरच्या केंद्रीय विद्यालया पासुन सुरु झाली आहे. म्हणून 1974 ते 2022 जून असा अठ्ठेचाळीस वर्षे झाली, मी किती वेळा काश्मीरला गेलो आहे ? हे नेमके आठवत नाही. आणि माझ्या प्रत्येक काश्मीर प्रवासात मला काश्मीरचे बदलत जाणारे स्वरूप पण माहित आहे.
आत्ताच्या भेटी आधी मला राष्ट्र सेवा दलाच्या वतीने, मुद्दाम बुरहान वनी नावाच्या एका 23 वर्षे वयाच्या तरूणाला सुरक्षा रक्षकांनी मारले असता, बहुतेक काश्मीर व जगाच्या पण इतिहासात पहिल्यांदाच सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ बंद करण्यात आला होता. म्हणुन मी 2016 च्या 1 आक्टोबर ते बारा आक्टोबर सलग दोन आठवडे सुरूवातीला जम्मू, रणजीतसिंह पूरा (भारत – पाकिस्तान सिमेवरच्या गावांमध्ये सर्जिकल स्ट्राईक नंतरच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलो होतो !), व 2007 मधे युपीए सरकारने काश्मीरी पंडितांना नवीन घरे बांधून दिली आहेत. ती पहायला जम्मू पासुन पंधरा किलोमीटर अंतरावरील जागति व नगरौटा येथे संपूर्ण एक दिवस बहुतेक दोन आक्टोबर रोजी, व तीन आक्टोबरला श्रीनगरमध्ये पोहोचलो. पण सर्वत्र स्मशानशांतता दिसली. एक पण दुकान, कार्यालय उघडलेले दिसले नाही. वाहने पण तुरळकच, आर्मी मात्र सर्वत्रच वावरत होती. आता शेतकऱ्यांच्या आंदोलनाने एक वर्ष पूर्ण केले. पण त्या आधी काश्मीरचा बंद सहा महिन्यांपेक्षा जास्त होता.
अशा तर्हेने 370 काढल्यावर आत्ताचा प्रवास प्रथमच होता. यावेळी माझ्या सोबत भागलपुर दंगली नंतर शांतिनिकेतन येथील काही विद्यार्थी प्रोफेसर वीणा आलासे यांच्या नेतृत्वाखाली शांतता, सद्भावना निर्माण करण्यासाठी जात होते ( 1989 – 90) त्यावेळी भागलपुरला जाणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी मनिषा बॅनर्जी सातत्याने येत होत्या, ज्या सध्या बांगला सांस्कृतिक मंच स्थापन करून, बंगालमध्ये सांप्रदायिक शक्तींचा मुकाबला करण्यासाठी प्रयत्न करत असुन . त्यां बंगाल सरकारच्या शाळेत प्राचार्य आहेत. त्या पण माझ्या सोबत काश्मीर प्रवासात सोबत होत्या.
1 जून रोजी निघून तीन जून रोजी रात्री दहा वाजता श्रीनगरला पोहचलो ! चार जून ते सात जून असे सलग चार दिवस, एक दिवस चरारेशरिफ सुफी दर्ग्याच्या रस्त्यावरील वटालु नावाच्या गावातल्या माध्यमिक शाळेत जायला मिळाले व मनिषा बॅनर्जी यांनी इंग्रजीचा क्लास पण घेऊन मुला – मुलींना सामुदायिक कश्मीरी लोकसंगीताची गाणी पण म्हणायला लावली व स्वतः बंगला बाउल लोकगीत ऐकवले, म्हणून शाळेच्या प्राचार्यांनी छान आटोपशीर सत्कार व आमचे छोटे भाषण झाले. सरकारी शाळा होती इमारत व संपुर्ण शाळेचा परिसर स्वच्छ आणि पर्वतावर असल्याने अतिशय सुंदर दृश्य पाहून आमचे डोळे निवले.
जवळच चरारेशरिफ होते म्हणून तेथेही गेलो. चरारेशरिफच्या आधीच एक – दोन किलोमीटर अंतरावर श्रीमती इंदिरा गांधी यांना, भारता तर्फे अंतराळयानाने अंतराळात गेलेल्या, राकेश शर्मा सोबत बोलण्यासाठी दोन प्रचंड आकाराचे राडार उभे केलेले आजही उभे आहेत. आता तेथे सीआरपीएफचे युनिट आहे. तसेच चरारेशरिफच्या चारही दिशांना आपल्या सुरक्षा दलाचे वेगवेगळ्या युनिट खुपच मोठ्या संख्येने दिसले. आणि तरीही एक पाकिस्तानी दहशतवादी मस्त गुल नांवाचा जवळपास वर्षभर तरी ( 11 में 1995) चरारेशरिफच्या परिसरात तळ ठोकून होता. चरारेशरिफच्या गांवात कुणाच्याही घरी जाऊन जेवण झाल्यावर झोपत पण होता. सोबत कायम ऐके 56 लोडेड बंदुक असायची,बर्याच दिवसांनी भारत सरकारने निर्णय घेतला, चरारेशरिफच्या परिसरात सुरक्षा दले पाठवून अॉपरेशन चरारेशरिफच्या लढाईत मुळ चरारेशरिफचा लाकडी दर्गा जळून खाक झाला. आणि मस्त गुल सुरक्षित पणे पाकिस्तानच्या हद्दीत पोहोचला. बहुतेक तो अजुन ही जीवंत असुन, दहशतवादी कारवाया करत आहे.
पांच जूनला ऋषि परवेज नांवाचा मुक्त पत्रकार मित्र आहे. जो 2011 मधे पॅलेस्टाईनच्या यात्रेत सहभागी झाला होता व ती यात्रा जवळपास एक महीना चालली होती. म्हणुन ऋषी परवेज, सैय्यद किरमाणी, मोहम्मद याकुब दर सज्जाद लद्दाखी हे चार काश्मीरचे मित्र लाभले आहेत. ज्यांना आम्ही आमच्या काश्मीर यात्रेत अवर्जून भेट घेत असतो. व आळीपाळीने यांच्याच कडे मुक्काम करतो. या वेळी चार जून मोहम्मद याकूब कडे व परवेज ऋषि व सैयद किरमाणी कडे मुक्काम केला होता. जो आमच्या काश्मीरी पंडित यांच्या नजरेने म्लेंछ (अस्पृशांकडे) आम्ही राहिलो म्हणून आस्चर्य बघायला मिळाले. आणि काश्मीरच्या पंडितांना काश्मीर सोडून इतरत्र रहावे लागते. याचा सल माझ्या मनात बत्तीस वर्षे झाली आहे. पण वंशश्रेष्ठत्वाचा गंड बाळगून नव्वद टक्के मुसलमानां सोबत राहणे कसे होईल ? हा प्रश्न घेऊनच मी परतीच्या प्रवासाला लागलो.
डॉ सुरेश खैरनार, शांतिनिकेतन 15 जून, 2022